November 17, 2007

विसूनाना उवाच..... (१)

नमस्कार मंडळी! मी काय सांगतोय, ऐकता का जरा??

हो, पण त्या आधी, माझी ओळख.... मी विश्वास कुलकर्णी, पण आता वयामानानुसार, विसूनाऽऽऽऽना, होऽऽऽ!! आणि मंडळी, विश्वास वरून विसूनाना या स्थित्यंतरापर्यंत यायला हे केस काळ्यांचे पांढरे झालेत आणि तसाच अनुभव ही जमलाय गाठीशी, म्हणून सांगतोय बापडा...... ऐकायच तर ऐका, उपयोगच होईल!! तर, अस ऐकतोय की लवकरच लग्नाच्या बेडीत अडकायची स्वप्न बघताय आपण?? ठीकाय. तर मग ऐकाच माझे अनुभवाचे बोल एकदा!

तर मित्रांनो, मी ही कधी तरूण होतोच की..... आणि आमच्या वेळचा तो काळ!! अहाहा, काय आठवणी सांगाव्या तुम्हांला!! सारा काळच मोठा मंतरलेला होता बघा..... तेव्हाची स्वस्ताई, भोळे भाबडे, तत्वनिष्ठ लोक, निवांत वावरणार जग... जमानाच वेगळा हो, आतासारख काहीच नाही. तर काय सांगत होतो, माझा तरूणपणीचा काळ! आणि ती भावगीतं, त्या भावगीतांच्या संगतीन आम्ही प्रेम केली, लग्न केली...... तर एक गाण होत बरका, मला अगदी आवडायच बरका, म्हणजे अस पहा, की, या गाण्यांतून ना, अगदी मला आमच्या हिच्याविषयी तेह्वा काय वाटायच ते अगदी व्यवस्थित व्यक्त व्हायच हो, नाही तर मला काय जमणार होते दगड धोंडे??

म्हणजे अस पहा, की ही अशी गाणी असतात ना, ती अगदी तुमच मन उघड करून दाखवतात हो, मनातल्या भावना बोलून दाखवतात अगदी, आपल्यासाठीच लिहिली आहेत की काय अस वाटाव ना इतकी फ़िट्टं असतात हो ती आपल्या सिच्युएशनसाठी!! मग आपण एकटे असू वा दुकटे!! असो.

तर सांगायचा मुद्दा काय, तर, सुरुवातीला ना, हे असच होत प्रत्येकालाच, अगदी एकशे दहा टक्के खात्रीने सांगतो!! अशी ही एक व्यक्ती तुम्हाला एकदम आवडायला लागते, इतकी ओढ लागते ह्या व्यक्तीची, जीव नुसता वेडापिसा व्हायचाच बाकी राहतो की!! आणि तुम्ही पण या एकाच व्यक्तीसाठी काहीही करायला तयार होता एकदम, अगदी बारा रेड्यांच बळच येत तुम्हांला!! मनाशी अगदी चंगच बांधता तुम्ही, की या व्यक्तीला अगदी सुखी करायचच!! दुसर काही नाही, भावगीत जगत असतो हो तुम्ही आणि आम्ही!! इतर वेळी स्वत:साठी पण जितकी तसदी घेणार नाही ना, तेवढी, आणि, त्यापलिकडेही तसदी घ्यायला तयार असता मग तुम्ही, आणि ते ही कोणीही काहीही न सांगता, आता बोला!! नाहीतर बसल्या जागेवरून पण हलायला नको अशी स्थिती असते प्रत्येकाची, काय बरोबर ना? हॅ, हॅ हॅ!! उगाच का बसलोय इथे सांगायला, आम्ही पण गेलोय की यातून...

हंऽऽऽऽ!! दर वेळेस मदार्‍याचा तोच खेळ आहे, दुसर काय!! तर सांगत काय होतो, लग्नाचे सुरुवातीचे दिवस म्हणजे स्वप्न हो, निव्वळ स्वप्न!! आणि मग तुम्हा दोघांना वाटत असत, की आयुष्य अस स्वप्नातच जगायचय म्हणून.

आणि मग अचानक एके दिवशी बदल घडायला सुरुवात होते, अगदी अचानकच, आणि सगळ्यांत त्रासदायक काय असेल ना, तर तुम्हांला स्वत:लाही ते उमजत पण नाही अगदी सुरुवातीला. म्हणजे अस बघा, सुरुवातीच्या काळात तुम्ही ज्या अगदी छोट्या, छोट्या गोष्टी करता ना तिच्याचसाठी म्हणून, त्या आता तुम्ही करेनासे होता!! एकदम ठप्पच होऊन जात ते!! अचानकच!! निव्वळ वेडेपणा, आणि वेळेची बरबादी असले काही बाही विचार येऊ लागतात हो मनात!! पण, सांगणार तरी कोणाला?? आणि, अगदी लक्षात ठेवा या म्हातार्‍याच हे वाक्य, का थांबतो आपण? तर, करू शकत नाही म्हणून नव्हे, तर आता इच्छाच रहात नाही म्हणून. लहानसच उदाहरण देतो हो, लग्गेच...... पटतय का नाही ते सांगा, मात्र खर सांगा!!

आमच्या वेळी बर का, माझ नवीनच लग्न झाल होत, तेह्वा, न विसरता मी हिच्या साठी गजरा घेऊन जायचो. आणि तो कसा न्यायचा? तर कोणालाही संशय येऊ नये असा, त्यामुळे, मग देवाला फ़ुलं, आई, बहीण यांना वेण्या, म्हणून मग हिलाही नेता येत असे!! पण खर काय ते फ़क्त आम्हा दोघांनाच ठाऊक होत तेह्वा!! आमच गुपितच की अगदी! अगदी न चुकता हा परिपाठ मी पार पाडत असे. मोगर्‍याचा गंध कसा अगदी अजूनही त्या दिवसांची आठवण ताजी करतो बघा.... कित्तीही काम असो, काही असो, मी घरी जाताना एवढ करायचोच, सगळेच खुष! एकाच कृत्याने कितीतरी पक्षी!! तुम्ही सरळ सरळ फ़ुलच देता हो आता, मग काय ते तुमच्या व्हॅलेंटाईन डेला पन्नास रुपयांना पडल तरी तेवढ करताच ना?? तसच होत ते आमच पण, हॅ, हॅ, हॅ...

आणि मग कळलच नाही की कधी बंद झालो फ़ुलं न्यायचा!! एके दिवशी कधीतरी बंदच झाला बघा तो सिलसिला! आता तर तिलाच सांगतो, देवापासून तिच्यापर्यंत सगळ्यांसाठी फ़ुलं आणायला, अगदी फ़ुलदाणीतली पण! आता बोला!!!

लग्नाच्या पहिल्या वर्षात बर का, मी हिच्यासाठी काही पण करायला अगदी दोन्ही पायांवर तयार असायचो, बाजारात जायचय? चला... इकडे जायचय, चला..... तिकडे जायचय, चला.... हापिसातून आल्यावर जायचय, हरकत नाही!! चला..... बंदा हाजिरच असायचा!! अगदी १० वेळा पर्वती चढा, आणि मग बाजारात जाऊया म्हणाली असती ना, तरी ते पण या पठ्ठ्याने केल असत तेव्हा, म्हणजे बघा!! होऽऽऽ!! पण आता चार जिने उतरून समोरच्या वाण्याकडे जा म्हणाली ना, तरी जीव कावतो हो अगदी!! हिला ना, हे सांगितल तरी पटत नाही! आता, गर्दी वाढ्लेय, लोकं इतकी भरधाव वाहन हाकत असतात…. ह्या सगळ्यात आता माझा म्हातार्‍याचा जीव गलबलतो की, पण आमच्या हिला काय वाटत, माहीतेय?? की आळशी झालोय! मनातल्या मनात, खायला काळ अन भुईला भार म्हणते, ते ऐकतो ना मी!! आता, जरा वयापरत्वे सुटलोय, तर लगेच भार झालोय की काय?? पण नाही!! पार बदलतात हो या बायका!! काय कळतच नाही अगदी बघा हे गौडबंगाल मला……

तेव्हा कशी, अगदी, डोळ्यांत प्राण आणून माझी वाट बघायची हो! हापिसातून आल्या आल्या चहा, खायला तयार, आपण स्वत: टीप टाप, काय बर वाटायच म्हणून सांगू!! आणि आता?? मारकी म्हैस परवडली की!! आणि तिच्यातच बदल झाला, का माझे डोळेच बदलले हेच मला अजून उमगलेल नाही बघा!! तिचं पण असच झाल असणार कायतरी…… कळतच नाही हो, लग्नाच्या पाचव्या की पंधराव्या वर्षापासून बदलाला सुरुवात होते ती, पण होते खरी, अगदी तुमच्या पण होणार बघा!! त्याची जरा तयारी आहे का पहा मनाची आधी, आणि मगच ह्या भानगडीत पडा बुवा!!

म्हणजे, अस बघा…….. आता इथे परत एक उदाहरण देतो हं... आता बघा, समजा, मला येऊन जर कोणी सांगितल, की विसूनाना, अहो, आशाकाकू – म्हणजे आमची ही हो – कश्याबश्या, चार -चार पिशव्या, दोन हातांत चार, चार अश्या हां – तर, अश्या घेऊन येताहेत घराकडे, अन दमलेल्या दिसतायेत….. आणि त्यांनी तुम्हाला जरा मदतीला बोलावलेय… तर मी काय करेन?? ज़र का हे तेह्वा झाले असते, तर पहिली गोष्ट, म्हणजे तिला एकटीला जाऊ दिले नसते, बर, समजा, गेलीच असती, तरी, मी, असा निरोप आल्याबरोबर लग्गेच धावलो असतो आणि सगळ्या पिशव्यांसकट तिलाही अगदी जपून घेऊन आलो असतो…. पण आता??

आधी निरोप आणलेल्यालाच विचारेन, की बाबा रे, तू जर होतास तिकडे, आणि इथे आलाच आहेस निरोप द्यायला, तर येताना तूच का नाही ओझे वाहिलेस सगळे?? किंवा मग माझ्या मुलाला नाही तर मुलीला सांगेन, जा, तिकडे जाऊन आईला मदत कर!! हो, रिक्षातूनच घेऊन ये म्हणून सांगेन मात्र. आताशा आमच्या हिला पण होत नाही खर तर, पण वय झालय हे स्वत:, तिनं मनातून मान्य नको का करायला?? असो, तो एक वेगळाच विषय आहे निरुपणासाठी!! ते राहूंद्यात सध्ध्या.....

सुरुवातीला मारे अगदी एकमेकांसाठीच डोळे वगैरे असतात तुम्हांला, अगदी डोळ्यांत मावत नाही तुमचा सहचर, अन नंतर त्याच्या चुकांशिवाय काही मावत नाही!! नक्की नाही सांगता येणार की लग्नाच्या पाचव्या का पंधराव्या वर्षापासून हे अस व्हायला लागत ते, पण होत खर अस मंडळी!! मग ते बाहेर जाण वगैरे शिक्षाच वाटायला लागते अगदी, पण सांगता कोणाला?? सुरुवातीच्या गुलाबी कालखंडात डोक गहाण ठेवून केलेल्या चुका भोवत असतात!! वाघ पण खाणारच आणि वाघोबा पण तेच करणार की!! कशालाच काही इलाज रहात नाही, हेच खरे असावे! मनातल्या मनात प्रत्येक शहाणा, पण परिस्थितीने वेडा बनलेला पुरुष प्राणी, रामदास स्वामींचे मनातल्या मनात अगदी कौतुकच करत असेल पहा!!

तर काय सांगत होतो... हंऽऽ,खर तर काहीही अन काहीपण शिक्षाच व्हायला लागते अगदी, पण सांगता कोणाला?? आणि वाद विवादांनी हळूहळू शिरकाव केलेलाच असतो संसारात, आणि हे जे लेखक मंडळी लिहितात ना, की थोडी फ़ार नोक झोक असल्याशिवाय संसाराची मजा नाही वगैरे, ते म्हणजे बर का, कोल्ह्याला द्राक्ष आंबट किंवा तत्सम प्रकार आहे अगदी!! होऽऽऽऽऽ, अगदी एकशे एक टक्के!! नक्कीच त्यांचं स्वत:च, त्यांच्या स्वत:च्याच घरात काहीऽऽऽही चालत नसणार!! नाहीतर, तुम्हींच मला सांगा, कोण सुखासुखी ह्या वादविवादांबद्दल इतक चांगल बोलेल?? करा विचार तुम्हींच!! मग आपल उलटच बोलतात, झाल!! आणि एक खोट हजारदा सांगितल की खर वाटायला लागत, त्यातला प्रकार झालाय हे वाक्य म्हणजे!! फार लांब कशाला जायला हवं, तुमच्याच घरी, तुमच्याच पिताश्रींना विचारा, तुमच्या मातोश्रींशी वाद घालायची ते किती उत्कंठेने वाट बघत असतात ते!!

तर सांगायचा मुद्दा काय मंडळी, तुम्हांला वाटत तस काऽऽऽऽही आयुष्यभर हवेत तरंगायला मिळत नाही बर!! जमिनीवर जितक्या लवकर याल, तितक बरच! त्याची तयारी असेल, तर मारा उडी, होऊन जाऊंद्यात, काय??

पण एवढ असल ना तरी तुम्हांला म्हणूनच सांगतो होऽऽऽ, अस वाटत कधी कधी आताशा, की पूर्वीपेक्षा मला जरा अंमळ जास्तच माया वाटते हो हिच्याबद्दल… आता आहे जरा तोंडाने फटकळ, अन करते थोडी आदळ आपट, पण तरीही घराच घरपण टिकलय हो आमच्या हिच्यामुळे... नक्की कधी जाणवायला लागलय हे, ते नाही सांगता येणार। म्हणजे, लग्नानंतरच्या पाचव्या का पंधराव्या वर्षी लक्षात आल, ते नाही ठाऊक, पण आलय खर!

कस आहे मंडळी, तराजूच पारड कस एकदा इकडे न एकदा तिकडे, तसच काहीस असत पहा, मधला काटा समतोल आहे ना, ह्या कडे लक्ष द्याव लागत सतत, एवढच. तेवढा समतोल सांभाळलात की मग सगळ काही ठिकठाक होऊन जात, हेच खर!

समाप्त.

7 comments:

Abhijit Bathe said...

सुरुवत सही आहे!
विसु नाना - बक अप! :)

Amol said...

suruvaat chaa.ngalee aahe, yeudyaat ajoon

Anonymous said...

नांदी तर सॊलिड झालीय! भाषेचा लहेजा एकदम भाई आहे! :-)

स्नेहल said...

:) mast suroowaat! paN aataa puDhachyaa bhaagaalaa jaast weL nako laavoos ga!

संदीप चित्रे said...

विसूनाना,
आता पुढे काय बोलणार आहात त्याची उत्सुकता आहे.गप्पांचा फड खूपच छान जमायला लागलाय.

Anonymous said...

विसुनाना ह्या वयातल्या कोणत्याही व्यक्तीच्या समांतर जातोय. मार्मिक अनुभुतीचा प्रत्यय आणून देणारे शब्द गतायुष्याचा पट उघडतात. छान! तुझ्याच शब्दात म्हणायचे तर हेच " जगणं" असतं . लिहित रहा. आशीर्वाद.

यशोधरा said...

आवर्जून वाचता अन कळवता, यासाठी, तुम्हां सार्‍यांचे खूप खूप आभार. करते आता लवकरच पूर्ण. :)