October 28, 2007

काठावरून निरखलेला कामाठीपुरा

दचकायला होत ना? एक मध्यमवर्गीय घरातल्या व्यक्तीकडून, त्यातल्या त्यात स्त्रीकडून/ मुलीकडून हा शब्द ऐकला तरी आजूबाजूच्या भुवया लगेच उंचावतात!! या शब्दाचा उच्चार करण म्हणजे देखील पाप जणू.... तुमच्या आमच्या मध्यमवर्गीय आयुष्यात या शब्दाला जागा नसते, जणू काही हे जग अस्तित्वातच नसत आपल्यासाठी. तर, अश्याच मध्यमवर्गीय गर्दीतली आणि बर्‍यापैकी तशीच मानसिकता असलेली मी एक. मुंबईमधेच, कामाठीपुरा म्हणून एक भाग, वसाहत आहे हेच मला माहीत नव्हत. याबाबत मी पूर्ण अनभिज्ञ होते, आणि मग एके दिवशी अचानक कामाठीपुरा माझ्यासमोर उलगडला, उलगडला कसला, अंगावरच आला एकदम...

काही वर्षांपूर्वी, काही वैयक्तिक कामांसाठी, काही महिने तरी मुंबईमधे फ़ोर्टला सतत भेट द्यावी लागणार, हे स्पष्ट झाल आणि पोटात पहिला गोळा तिथेच आला! मुंबईच्या अफ़ाट बिनचेहर्‍याच्या गर्दीची मला नेहमीच धास्ती वाटते, सहनच होत नाही ती गर्दी मला. नेहमीच धावत पळत असणारी माणस बघूनच मला गुदमरायला होत आणि आता त्याच गर्दीचा एक नगण्य भाग बनून मला त्यांच्यामधेच वावरायच होत. एक बर होत की रोजची कसरत असणार नवह्ती. मधून मधून सलग, पुण्यात परतायला पण मिळणार होत आणि मुंबईच्या मानाने निवांत अस आयुष्य पण जगायला मिळणार होत. तेवढच बर वाटायच. सात समुद्रापार जाऊन देखील पुण्याची ओढ आणि थोडाफार पुणेरीपणा काही सुटत नाही!! मानाची बिरूद मिरवायला कोणाला आवडत नाही म्हणा!!

म्हणता, म्हणता, मुंबईलाही आपल म्हणायचे दिवस उजाडले आणि, मनात बरीच धाकधूक घेऊन, मी मुंबईत पोहोचले.

नशिबाने, मुंबईमधे नातेवाईक आहेत. मी मावशीकडेच राहणार होते. तिच्या घरापासून लोकल स्टेशन आणि बेस्टचा डेपो, जवळच आहेत. एक दिवस सोबत बरोबर घेऊन , लोकलची आणि पर्यायाने लोकांची गडबड, धांदल बघूनच लक्षात आले की हे काही आपल्याला झेपणारे नाही, आपल्यासाठी बसच बरी. मी बसच्या पहिल्या स्टॉपलाच चढणार होते, त्यामुळे गर्दी वगैरेची चिंता नव्हती, गंतव्य स्थानाच्या बर्‍यापैकी दारातच उतरू शकले असते, त्यामुले ती ही चिंता राहिली नव्हती. मुंबईमधे जर आधी कधीच वावरला नसाल आणि एकदम असे फ़िरायला लागले, तर मी काय म्हणते आहे ते लक्षात येईल, निदान मला तरी सुरुवातीला खूपच गोंधळल्यासारखे वाटत असे. तर पहिले दोन तीन दिवस मामाने बरोबर यायचे ठरवले. त्याच्या बरोबर गप्पांमधे प्रवासात वेळ कसा जायचा समजत नसे, बाहेरची गर्दी, रस्ता, कशाकडेच फ़ारसे लक्ष न देता, आम्ही खूप गप्पा मारत असू. बरे, तो बरोबर असल्याने मी ही निर्धास्त.

मग, दोन तीन दिवसांनी मी एकटेच जायचे ठरवले, रोज रोज मामाला तरी कुठे जमणार होते माझ्या बरोबर यायला? त्यालाही त्याचे घड्याळाच्या काट्यांवर पळणारे आयुष्य होतेच की. आता इतका आत्मविश्वास नक्कीच आला होता, कि एकटी जाऊ येऊ शकेन, आणि बरोबर घरच्यांचा फ़ोन नंबर होताच. पुस्तक पण घेतले होते वाचायला बरोबर. पुस्तक घेऊन गेले की कुठला ही प्रवास कंटाळवाणा होत नाही, त्यामुळे प्रवासात एक वेळ तिकिट विसरेन, पण पुस्तक नाही!! पहिले तीन चार दिवस, बसमधे चढून एकदा तिकीट काढल की मी पुस्तकात डोके खूपसून वाचत बसत असे. साधारण फ़ोर्टचा भाग लागला, की कंडक्टर ओरडून सांगतच असे, त्यामुळे तशी काळजी नसे. आणि एक दिवस असच वाचत बसलेले असताना, बसच्या बाहेर खूप गलका ऐकयला आला अन, वाचनाच्या तंद्रीतून एकदम जागी झाले.

पहाते तो काय, समोरचा माहौल इतका वेगळा होता... साधारण मध्यमवर्गीय किंवा अतिशय उच्चभ्रू वातावरणापेक्षा अतिशय वेगळ, भसकन अंगावर येईल अस वातावरण वाटल मला ते त्या वेळी.

पहिली पाच दहा मिनिट केवळ अवाक होऊन बसच्या खिडकीतून बाहेर बघण्यातच गेली!! आणि एकदम लक्षात आल, ही वेश्या वस्ती!! तेवढयात पाटीही दिसली लहानशी, कामाठीपुरा. बस, येवढच लिहिलेल. कदाचित, ज्यांना इथे यायची गरज पडते, त्यांच्या साठी पुरेस असाव तेवढच. बस वेश्या वस्तीतून जाते आहे, लक्षात आल, आणि उगीचच माझच मन कसनुस झाल! म्हणजे रोज बस इथून जात होती?? आणि आपल्या काहीच नाही लक्षात आल?? मला खरच वाटेना.... नंतर किती तरी वेळ माझ्या मनातून ते वातावरण पुसलच जात नव्हत. विदारक हा शब्द ऐकला होता, पण विदारक शब्दाचा अर्थ त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिला. अतिशय सुन्न करून टाकणारा असा तो अनुभव होता....

तेह्वासुध्द्धा, पाहताक्षणी जाणवल, ते अतिशय भकास वातावरण, आणि तसेच उदास चेहरे. रस्त्यातली वर्दळही तशीच. कोणाची दखल न घेता, अलिप्त आणि मख्ख देहबोली घेऊन जगणारी, आपल्या आपल्या आयुष्याचे भार सांभाळणारी अन ओढणारी, दैन्य पांघरलेली गर्दी. अन त्यानंतर बसच्या बाहेर पहायच धाडस उरलच नाही त्या दिवशी. परत एकदा मी पुस्तकात डोक खुपसल आणि तशीच बसून राहिले. फ़ोर्ट आल, तस कंडक्टरने ओरडून सूचना दिली अन, मी तंद्रीतून जागी झाले!! इतका वेळ मी एकाच पानावर डोळे खिळवून बसले होते? लक्षातच नाही आल! एक प्रकारचा सुन्नपणा मला वेढून राहिला होता.... त्यातल्यात्यात एवढेच बरे होते, की परत जाताना मी जी बस घेत होते, ती कामाठी पुर्‍यातून जात नसे. कदाचित दुसरी बस मिळत असावी. माझा शेवटचा थांबा असल्याने, त्या थांब्याच्या नावाचा फ़लक बसवर लावलेला दिसला की मी जास्त विचार न करता बसमधे चढत असे!! काम संपवून घरी पोचले तरी, डोक्यातून विषय जात नव्हता... उद्या परत बस तिथूनच जाणार हे जाणवून उगाचच एक दडपण आले होते मनावर.

... आणि परत एकदा, दुसर्‍या दिवशी मी त्याच बसमधे चढले. आज पहिल्यांदाच मी बसमधे वाचत नव्हते. परत एकदा बस कामाठी पुर्‍याच्या रस्त्याला लागली, पण आज मी सारे पाहणार होते.. मनात थोडी भीती, थोडी जिज्ञासा, कुतूहल... हळू हळू नजर एकेक तपशील टिपत गेली... गलिच्छ रस्ता, ठिकठिकाणी फ़ेकलेला कचरा, सांडपाणी, त्यातच खाण्याच्या पदार्थाचे ठेले मांडलेले विक्रेते, चहावाले, इतर दुकाने, विक्रेते, दुकानातली गिर्‍हाईके. मला सगळयात आश्चर्य वाटत होते ते म्हणजे त्यांच्या तिथल्या सराईत वावरण्याचे. अर्थात, त्यांच्या साठी ते रोजचेच जगणे होते, अन रोज मरे त्याला कोण रडे, असेच होत असावे त्यांचे.

रोज सकाळच्या वेळी तिथल्या, देह विक्रयाचा व्यवसाय करणार्‍या स्त्रिया, रस्त्यावर किंवा त्यांच्या खोल्यांच्या दारांत बसलेल्या असायच्या. काही एकमेकींशी बोलत असायच्या, काही जणी उगाच थकून भागून बसलेल्या. सगळे काही स्वीकारल्या सारख्या. तर काही उगाच कुठे तरी भकास नजरेने पहात हरवलेल्या.. सार्‍याच थकलेल्या, भागलेल्या.. आणि काही आक्रस्ताळेपणे झगडताना दिसायच्या. नक्की कोणाशी भांडत असायच्या कोण जाणे? समोरच्या व्यक्तीशी? नशीबाशी? नियतीशी? दैवाशी?? की देवाशी?? या स्त्रियांना बघणे, त्यांच निरीक्षण करणे हा एक कडवट अनुभव होता माझ्यासाठी. का म्हणून यांच्या नशिबात हे दान पडल होत?

इथे येताना कितीजणींना आपण कुठे आणि का चाललोय ते माहीत असेल? अजाणत्या वयात काय अनुभव घेतले असतील? मनावर ओरखडे उठले असतीलच ना? नक्कीच.. आणि मग कदाचित एक दिवस सार काही मनाविरुद्ध अंगवळणी पडल असेल, पाडून घ्याव लागल असेल.. काहींनी कळत्या वयात, नाइलाज म्हणून हे अग्निदिव्य स्वीकारल असेल, घरच्यांवर मायेची पाखर घालण्यासाठी स्वत: अंतर्बाह्य जळत असतील, आणि ही पाखर घालतानाही आपल अस्तित्व दृष्टीआड ठेवून. घरचे लोकही कदाचित दृष्टीआड सृष्टी म्हणत असतील का?? कधीकधी माणसाचे नाइलाज किती पराकोटीचे असू शकतात..... सारच अर्तक्य! काहींची स्वप्नं चुरगाळली गेली असतील, ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी अश्याच कोणी नवर्‍याने, प्रियकराने, भावाने, नात्यातल्या काका, मामानेच या लेकी बाळींना इथे आणून इथल्या गिधाडंपुढे फेकून दिल असेल! या लेकी बाळी ही कधी काळी निरागसपणे कुठे तरी, आपापल्या घरच्या अंगणात बागडल्या असतील, काहींनी परकराच्या ओच्यात फुल, पान जमवली असतील, काहींनी भातुकलीचे संसार मांडले असतील, सख्यांबरोबर साईसुट्यो खेळल्या असतील.. घरच अठरा विश्व दारिद्र्य आणि झोपडीतला अंधार देखील यांच्या स्वच्छ हसण्याने उजळून निघाला असेल..... आज तस हसू फ़ुलेल कधी यांच्या चेहर्‍यावर? आयुष्यात परत या स्त्रियांचा कधी, कोणावर विश्वास बसेल??

आणि रस्त्यालगतच बागडणारी या माउल्यांची लहान मुल?? त्यांच्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतात!! त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल…। काय भविष्य आहे यांच, हा प्रश्न सतत मनत आल्याशिवाय राहिला नाही… यातल्या मुली असतील, त्यांच हे हसू असच कायम राहील?? का आसूंत बदलेल? या मुलांच निरागस मन निब्बर व्हायला किती लवकर सुरुवात होत असेल! त्यांना देखील याच खातेर्‍यात उडी घ्यावी लागणार आहे का? काय वाटत असेल तिथे व्यवसाय करणार्‍या आईला, लेक पोटी आली म्हणून? काय विचार करत असतील ह्या आया आपल्या लेकरांच्या भवितव्याचा? असा काही विचार करायची मुभा नियती देत असेल त्यांना ?? सगळीच परिस्थिती, दाटला अंधार अशी.....

तिथल्या ह्या स्त्रियांच्या खोल्यांकडे बघवत नव्हतं, मोठया मोठया खिडक्या असणार्‍या काडेपेट्यांसारख्या, तितकीच लांबी, रुंदी असलेल्या ह्या खोल्या पाहून, कबुतरांची खुराडी सुद्धा बरी अस वाटल्या वाचून राहिल नाही. रात्रीच्या वेळेस, ह्याच काडेपेट्यांचे विलास महाल बनतात? तेव्हा, या विलास महालातली औट घटकेची रातराणी, आपल्या कच्च्या बच्च्यांना कुठे आसरा देत असेल? कोणा महाभागाची औट घटकेची सोबत करताना, तिच्या मनात काय येत असेल? मन कस आणि किती आक्रंदत असेल? असे किती मातांचे, नवतरुणींचे, अबोध बालिकांचे आक्रोश या भिंतींनी पाहिले असतील? पचवू शकल्या असतील? सकाळच्या वेळेस, या खोल्यांच्या भिंती अगदी भकास वाटायच्या, जणू काही या बायकांच्या मनातल्या मूक आक्रोशाच्या साक्षीदार होता होता, जगायच विसरून गेल्यासारख्या. सार्‍या वातावरणातच एक मृतप्राय कळा, एक उदासवाणा, अलिप्त भाव. जणू माणूसकीची जिती जागती कबर.

उगाचच एक वाक्य आठवल होत तेह्वा. स्त्री ही क्षणकालची पत्नी अन अनंतकालची माता असते.... किती वेगळ्या अर्थाने ते वाक्य तिथे साकार झाल होत!

.... अजून एक विरोधाभास पाहिला अन खूप जाणवलाही.

एक रेणुकामातेच देऊळ होत, छोटस, सुंदरस.. मनोभावे स्त्री रुपाची, आदिशक्तीची पूजा झालेली दिसत होती. देवीची मुद्रा प्रसन्न, हसरी, नजर तिच्या ह्या लेकींकडे. देवळाच्या बाहेर एक पताका लावलेली होती, त्यावर देवी सूक्तातले मंत्र ठळक अक्षरात लिहिले होते...

ll या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता l नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ll

काय पाहत होती आई उघड्या डोळ्यांनी? मानवरुपातल्या स्त्रीशक्तीची, मातृरुपाची विटंबना? दैन्य, लाचारी, असहायता???

का सगळे फक्त शब्दांचे बुडबुडे केवळ???

2 comments:

संदीप चित्रे said...

यशोधरा,
एका खूप वेगळ्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. पूर्ण लेख वाचायची वाट पाहतोय.

नरेंद्र गोळे said...

अशा ठिकाणी कधी जायची पाळी आली तर, आपल्याला आजवर मिळालेल्या सुरक्षिततेच्या ठिकर्‍या ठिकर्‍या व्हाव्यात अशी भावना अचानक दाटून येते.

जे प्रश्न आजवर कधीच आपल्यापर्यंत पोहोचले नव्हते त्यांच्या फैरींनी मन बेजार होते. मग जाणवते ते एवढेच की आपण खूप प्रश्न सोडवले ह्या भ्रमातून बाहेर येऊन आपण पुन्हा खर्‍याखुर्‍या प्रश्नांचे डोंगर खर्‍याखुर्‍या डोळ्यांनी पाहू लागतो. त्यांच्या शक्य त्या समाधानाकरता.