December 5, 2007

ब्लॉग जंकी

आज पहाटे चार वाजता हापिसचा ऑन कॉल मोबाईल किणकिणला!! मनातल्या मनात शिव्या घालत, कानाशी धरला तर पार साता समुद्रापलीकडून, राणीच्या देशातून हापिसमधला गोरा बोलत होता... काही तरी क्रिटिकल प्रॉब्लेम होता, अन मदत करतेस का म्हणून. नाही म्हटल तर चालणार नसतच!! नको रे बाबा आता, मला झोपायचय खरतर, उद्या बघू, अस सांगून चालत नाही!! मग उगाच आपल अर्थ नसलेल स्मॉल टॉक अन फालतू गप्पांचा प्रयत्न. पहाटे चारला गप्पा तरी काय मारायच्या डोळ्यांत झोप असताना?? काही जण मस्त गप्पा मारतात अन काही जण उगाच राजघराण्याकडून "स्टिफ़ अप्पर लिप" शिकवण घेऊन आल्यासारखे असतात वागायला. जाऊंदेत.

तर, प्रॉब्लेमवर काम केल अन मग सुटलाही तसा पटकन, दिडेक तासात, मग लगेच झोप येईना, अन मराठी ब्लॉगविश्वात भ्रमंती सुरु केली. कधी कधी वाटत, ब्लॉग जंकी होणार मी, का झालेय एव्हांना? पण खूप छान छान पोस्टस वाचायला मिळतात अन बर्‍याच वेळा प्रतिक्रिया द्यायचा मोह मी आवरते, उगाच आपल काय, जिकडे तिकडे आपल्या पाऊलखुणा उमटवत बसायच!! :D पण सही लिहितात मंडळी!! कधी कधी, म्हणजे बर्‍याचदा इतरांच लिखाण वाचून मला जाम कॉम्प्लेक्स येतो!! आपण काय भिकारचोट लिहितो अन का लिहितो अस वाटत! पण काय... आता व्यसन जडल्यासारख झालय थोडफार.... म्हणतात ना, नाविलाज को क्या विलाज, तस्सच अगदी!! असो.

तर, उठले तेह्वा बाहेर इतका गडद अंधार होता, इतकी निरव शांतता... आणि मग काम करताना, आणि नंतर भ्रमंती करता करत बाहेर नजर गेली तर अंधार पुसला गेला होता अलगद अन सकाळ हलके हलके उजळत होती.......इतक ग्रेट वाटल पाहताना!! म्हणून हा लेखन प्रपंच, शब्दांत पकडून परत कधीतरी अनुभवायला. तरी कठीणच आहे शब्दांत पकडण तस. तरीही बसलेय लिहायला, झालेच आता मी ब्लॉग जंकी! नक्कीच!!

कदाचित, एखाद दिवशी लांबलचक चाललेल्या कंटाळवाण्या रटाळ मीटींगमधून बाहेर पडल्यावर वाचल तर बर वाटेल का?? :)

5 comments:

सर्किट said...

छान लिहीलंयेस.

तसंही आता ब्लॉगविश्वावर गेय कविता, यमकी कविता, चारोळ्या, त्रिवेणी, यांसोबत भयंकर मुक्तछंदातल्या कवितांचं लोण पसरत चालल्याने प्लेन गद्य वाचायला मिळणं कठीण होत चाललंय.

तू कमी शब्दांत उजाडणाऱ्या दिवसाचं वर्णन सही केलंयेस..

आणि लोकांच्या ब्लॉग्जवर कॉमेण्ट्स लिहायला लाजू नकोस, कारण कुणी कबूल नाही केलं तरी प्रत्येक ब्लॉगओनर कॉमेण्ट्सचा भुकेला असतोच. काहीकाहींना तर आधीच्या पोस्टवर कॉमेण्ट्सचा आकडा डबल-डिजिट झाल्याशिवाय नवं पोस्ट लिहायची खुमखुमी येतच नाही. ;-)
जस्ट किडिंग..
पण जर काही आवडलं / नाही आवडलं तर सांगायला पाहिजे - नुसतेच एकमेकांचे ब्लॉग्ज वाचून आपण पळून जात राहिलो तर कम्युनिटी बनणार कशी? आणि नाहीतरी कोण वाचतंय या फ़्रस्ट्रेशनपायी चांगल्या ब्लॉगर्सनी ब्लॉगिंग बंद केलं तर नुकसानच नां?

यशोधरा said...

अभिजित, धन्यवाद.

>>> भयंकर मुक्तछंदातल्या कवितांचं लोण..
:D!

>>>> चांगल्या ब्लॉगर्सनी ब्लॉगिंग बंद केलं तर...
भलताच गैरसमज झालेला दिसतोय तुमचा माझ्याबद्दल!! :D इतका सन्मान!! मन कस भरून आल हो!!थट्टा राहूदेत, मनापासून धन्यवाद. येत रहा. :)

अभिजित पेंढारकर said...

थोडक्यात, पण नेमकं लिहिलंयस.
लिहीत राहा.
माझ्या ब्लॉगवरच्या कॉमेंटबद्दल पण धन्यवाद.

पण हे काय...?
हे अजाणता लिहिलंयस, की जाणुनबुजून?

``आपण काय भिकारचोट लिहितो अन का लिहितो अस वाटत!"

यशोधरा said...

नाही अभिजित (पेंढारकर) खरच अस वाटत मला कधी कधी. विषेशत: काही काही ब्लॉग इतके सुंदर लिहिले आहेत, ते वाचले, की हे आपल्याला जमणारे काम नाहीये, लिखाण सोडून द्याव अस कैक वेळा मनात येऊन जात!! पण आता ब्लॉग विश्वात रमलेय खरी :)

तेह्वा, आता सर्वांनाच शिक्षा आहे खरी मी लिहिलेल पण वाचायची!! :P

सर्किट said...

>>>> भलताच गैरसमज झालेला दिसतोय ..

छे: छे:, ते मी माझ्या ब्लॉगबद्दल लिहीलं होतं. की नवोदित ब्लॉगर्सनी जुन्या ब्लॉगर्सच्या पोस्ट्स वाचून पळून न जाता कॉमेण्ट्स लिहाव्यात, असं म्हणायचं होतं मला. हे..हे..हे..हे.. :)