December 7, 2007

मराठीचिये पाईंका वक्र पाहे....

हा आजचा किस्सा, असच आज आठवला म्हणून... गमती, गमतीत :)

काय झाल, की बंगळुरुत आल्यावर एखाद्या तहानलेल्याला जस पाणी, पाणी व्हाव ना, अगदी तस्सच, मला मराठी, मराठी झाल होत!! कुठेही जा, आपल, कुडुकुडूच ऐकू यायच!! आणि मराठी आठवून बेचैन व्हायच!

नाही, नाही, माझी कुठल्याही भाषेशी कसलीही दुश्मनी नाहीये. खर सांगायच तर मला वेगळ्या भाषा शिकायला आवडत. वेगवेगळे शब्द वगैरे. आतापण माझ्याबरोबर काम करणार्‍या सहकार्‍यांना मी पीडतच असते की कन्नड शिकवा वगैरे..... शिकवणी सुरुपण झालीये अख्ख्या टीमकडून! :D मजा येते, पण शेवटी माय मराठी ती माय मराठीच ना?? म्हणजे मी ही अधून मधून विंग्रजी शब्द वापरतेच, अस काही ज्वलंत भाषाभिमानीपणा वगैरे नाही करत, पण शेवटी आपली भाषा ती आपलीच भाषा.

आता बघा, की जर मला म्हटल, की तुला २ पर्याय आहेत, सुंदर अलंकारयुक्त अस काही तरी कन्नड ऐक - आता खर तर,मुळात साध कन्नड पण मल येवढ येत नाही, तर अलंकारयुक्त काय कळणार कप्पाळ!! पण सध्ध्या कन्नड भागात आहे, मग पटकन तेच आल मनात, बर, हिंदी म्हणूयात - तर सुधारीत आवृत्तीनुसार अलंकारिक हिंदी ऐक, किंवा मराठीतल्या शिव्या ऐक, कोणता पर्याय निवडशील?? दुसर्‍या क्षणाला, मी भन्नाट शिव्या ऐकण्याचा पर्याय निवडेन!!! खरच, शप्पत!! यावर काहीही म्हणालात, तरी शेवटी, माझ्यासाठी, माझी मराठी आहेच माझा बाब्या!! आणि यावर कोणाचेच, काहीही विरुद्ध मत मला ऐकायचे नाहीये!! खलास!! :D

आणि तसही बरका, विरुद्ध, अभ्यासपूर्ण, चिकित्सक, तात्विक मतं मांडायचे, अन तीच मतं कशी योग्य आहेत (बरोबर नव्हेत, योग्यच!! बरोबर मत अस म्हटल की ते फुटकळ मत वाटत, योग्य म्हटल की कस एक वजन येत त्याला!) हे आग्रहानं आणि अट्टाहासानं प्रतिपादन (शब्द फाऽऽर महत्वाचाय बर!!) करण्याचे सगळे घाऊक हक्क आम्हां पुणेकरांकडे अत्यंत सुरक्षित आहेत!! कायमच्या निविदा भरल्यात आम्ही त्यासाठी अन त्या मंजूर झाल्याच असाव्यात!! :D त्याशिवाय का आम्हांला जमत अस हे वागा बोलायला सगळ आणि ते ही सतत?? असो, खूपच विषयांतर झाल.

तर, इथे आल्यावर, हापिसमधे कोणी माझ्या मराठीचिये कौतुके बोलणारे आहे का, ह्याच शोध घ्यायला लगेच सुरुवात केली आणि सुदैवाने चार एक टाळकी सापडली. बर वाटल, मग अर्थात आम्ही एकमेकांशी मराठीतूनच बोलायचो/बोलतो, जाम धमाल यायची आणि येते गप्पा मारायला, आणि सगळ्यात ग्रेट म्हणजे, दोन जण माझ्याच टीममधे आहेत.

तर, असच एकदा, गप्पा मारताना माझा एक मद्र देशीय सहकारी तिथे आला, रीतीप्रमाणे त्यालाही हाय हॅलो केल, कस चाललय वगैरे विचारल.. आणि, अर्थात हे विंग्रजीमधून, कारण, त्यांना एक मद्र आणि दुसरी विंग्रजी ह्या दोन भाषा सोडून, अगदी ते राहतात त्या राष्ट्राची भाषा बोलायची पण विलक्षण एलर्जी आहे!!

आणि कोणी काही लेक्चर द्यायच्या आत सांगतेय, मी मुळीच सगळ्यांना एकच पट्टीने मोजत नाहीये. माझी शेजारीण पण मद्र देशीयच आहे, आणि आमच एकदम गूळपीठ आहे. आणि ती चक्क मस्त हिंदीही बोलते, अन कधी कधी मला पण मद्र भाषेतले शब्द शिकवते, आणि मी ही शिकते. कुठलीच भाषा शिकायच मला काही वावड नाहीये, विरोध आहे तो प्रवृत्तीला, राष्ट्र भाषा येत नाही याचा अभिमान कसला?? हा तर निव्वळ करंटेपणा आहे, अस माझ मत आहे.

तर, सुरुवातीला ठीक बोलत होतो आम्ही इथल तिथल, मग तो एकदम, आमच्या मराठी बोलण्यावरच घसरला!! आणि मग ही मुक्ताफळ उडाली!! तेच मूळ संवाद घालायचा मोह आवरत नाहीये, म्हणून त्यातल्या त्यात सेंसॉर करून... :D

मद्रमॅन: व्हाऽऽट इस धिऽऽसऽऽऽ यू आल आऽऽऽऽलवेज स्पीक इन यूवर लॅंग्वेऽऽज... धिऽऽस इज वेऽऽऽऽरी रॉंग! ग वर जोर देऊन!

आम्ही जरा उडालोच!! अरेच्या! याला काय चावल आता!! आधी आम्ही समजलो की तो खेचतोय आमची, मग लक्षात आल की, तस नाही, खरच म्हणतोय तो, तेवढ्यात,

मद्रमॅन: यू मस्ट स्पीक इन अवर लॅंग्वेज, दु यू नो, देअर इज नोऽऽऽ लॅंग्वेज लाईक अवर्स!! इट इज इंटऽऽऽर् नॅशनल लंग्वेज, यू नो??

आमची डोचकी सटकायला लागलेली!!

मी: इंटरनॅशनल?? सिन्स व्हेन?? हाउ कम??

मद्रमॅन: यू डोंट नो?? व्हाऽऽट यू आर सेईंग?? इट इज स्पोकन इन श्रीलंका, यू नो दॅट???

आम्ही प्रचंड वैतागाने, पण प्रचंड हसू यायला लागल्याने, खुर्च्यांमधून पडायच्या बेतात होतो!! आणि आता मराठी मॅन पण वैतागलेले!! आता सगळ्यांनाच खुमखुमी चढलेली!!

मराठी मॅन १: सो व्हाय डोंट यू गो टू श्रीलंका?? सेटल डाऊन देअर?

मराठी मॅन २: लेका फ़ुकण्या ( ए, तू कान बंद कर आता, मी त्याला शिव्या ऐकवतो मस्त - हे मला) भXXXx तिकडे मुंबईत येता लेको, तिकडे काय मराठी शिकता का रे?? तू भेट रे साल्या बाहेर!! च्यायला, माज उतरवतो तुझा, मराठी बोलू नका म्हणतोय!!

नंतरच्या शिव्या न लिहिल्याबद्दल क्षमस्व वाचक हो! (कोणी वाचत असाल तर!)

मद्रमॅन : व्हाऽऽट इज धिस?? आय एम नॉट फ़ॉलोइंग यू गाऽऽईज!! स्पीक इन इंग्लिश, सो दॅट आय कॅन फ़ॉलो....

मराठी मॅन १: अबे, मेरी बात को समझ ध्यानसे, एक तो हम मराठीं में बोलना तो छोडने वाले नहीं, तेरी लॅंवेज इंटरनॅशनल हो या और कुछ...

मद्रमॅन: आय डोंट अंडरस्टॅंड हिंदी...

मराठी मॅन१ : वो तुम्हारा प्रॉब्लेम है, नहीं आती तो सीखो!!

आणि अस बरच काय काय वाजल!! त्यानंतर त्याच्या समोर तर मराठीतच बोलयचो आम्हीं अन त्याच्याशी बोलताना हिंदीतच बोलायचो!

सुरुवातीला त्याने कांगावा केला, पण आम्हां मराठी लोकांची डोकी जरा तरकटच राव!! एकदा खुन्नस म्हणजे खुन्नस, बस!! मद्रमॅन आता झक्कत हिंदीतही बोलतो!!!

आणि आम्ही सुखाने मराठी गप्पांचा फड त्याच्या समोर, त्याच्या नाकावर टीच्चून जमवतो!!

6 comments:

Amol said...

वा वा मजा आली वाचायला. असे अनुभव मलाही आलेत. मराठी लोकांनी बंगलोर मधे तमिळ मधून बोलावे ही अपेक्षा महान आहे :)

Tulip said...

lol.. एका तरी तमिळाला भाषेबद्दल असं कळवळायला लावलतं तुम्ही हे ग्रेटच:)).
छान आणि सहज लिहिते आहेस यशोधरा (नावही छान आहे तुझं).
बरीचशी पोस्ट्स आत्ता एकदम वाचली त्यामुळे ह्या एका पोस्ट बद्दल नाही तर आधीच्याही काही पोस्ट्स बद्दल ही कमेन्ट समज( माल्वणी आणी कवितेचं पोस्ट सोडून:P ते कळत नाही म्हणून स्कीप केलं.)
एक पत्र सुरेखच जमलं होतं. भाषा-इन्टेन्सीटी आणि लिहायची पद्धत सगळंच.असं लिहिताना खूपदा एकतर अती भावनीकता नाहीतर लाऊडनेस येतो आणि तो तु येऊ दिला नाहीस हे आवडलं

Manogat said...

http://www.manogat.com/node/2839
he vaachaa.

Abhijit Dharmadhikari said...

जबरी! "खबरदार जर टाच मारूनी" ष्टाईल आवडली. कोईम्बतूरला मी तो अनुभव घेतला आहे.

असो! इथून पुढे xxxx फुल्याफुल्यांचा ष्टाक कमी पडल्यास जरूर सांगावे, माझ्याकडे त्याचा "मॉल" आहे:-)

Yashodhara said...

मनोगत, तुमचा लेख वाचला. मध्यंतरीच्या काळात मीही ज्ञान संपादन केलेय की हिंदी की कार्यालयीन व्यवहाराची भाषा आहे. राष्ट्रभाषा, जी सार्‍या देशाला एकसंध भावनेत बांधू शकते, तीच नाही आपल्याकडे... असो. खरेतर, हे समजले तेह्वा वाईटच वाटले मला..

अर्थात, मद्र माणसाशी खुन्नस घ्यावी लागली कारण चार मराठी लोकांनी पण आपापसात मराठी बोलू नये असे फ़र्मान काढले त्याने!! बाकी काही नाही!! असे कोण ऐकून घेणार? मी तरी नाही!!

ऍडी जोशी said...

शब्बास गलगले :-) हा प्रयोग आम्हीही मधून मधून करतो.
मी आणि माझा बॉस गोडबोले,एक मेकांशी मराठीतून'च' बोलताना बाकिची माणसं भूत पाहिल्या सारखा चेहेरा करून उभी असतात. मग त्यांच्यावर दया करून आम्ही थोडावेळाने हिंदीत सुरुवात करतो.