December 30, 2007

संकल्पाची ऐशी तैशी

जसजस नव वर्ष जवळ येतय, तसतस नवीन वर्षाचे संकल्प, या विषयाला चांगलीच मागणी आणि धार चढायला लागलेली दिसतेय! बर्‍याच अनुदिन्यांवर देखील नवीन वर्ष, नवे संकल्प इ. इ. वर लेखण्या सरसावल्या गेल्यात!! बर्‍यापैकी चावीफळे (पक्षी: कीबोर्ड) बडवून झालेत! बर्‍याच उत्साही जनांनी 'नेमेचि येतो मग पावसाळा' च्या धर्तीवर 'नेमेचि करु या संकल्प आता' म्हणून संकल्प केले असतील. हां, आता अजून १ जानेवारी २००८ आणि पुढच वर्ष उजाडलेल नाही, त्यामुळे, हे संकल्प खरोखरीच राबवले जाताहेत का ते मात्र कळायला अजून वाव नाही!! अर्थात, घोडा मैदान जवळच आहे म्हणा, कळेलच लवकर कोण किती दृढनिश्चयी आहे, आणि संकल्पांची घोडी कुठपर्यंत दामटली जाताहेत ते!!

मला विचाराल तर, माझा काहीही संकल्प नाही!! आतापर्यंत संकल्प करण्याचे अन ते डोळ्यांदेखत आणि मनादेखत खितपत पडण्याचे अन पाडण्याचे भरपूर प्रयत्न आणि प्रयोग आपसूकच झालेत. त्यात परत काय आहे, की मुळातला पिंड आहे गोवा, कारवार वगैरे या भागातला, तेह्वा उगाच कटकट, दगदग करायला आवडत नाही! सुशेगात राहण्याला प्रथम पसंती!! त्यात हे असल काय बसत नाही हो!! जेवढ काही जिवाला त्रास न देता, सहजगत्या होऊ शकत तेवढच करायच, हे ब्रीदवाक्य. स्वतःच संकल्प करायचे, स्वतःच त्याची आखणी करायची, व्यवस्थित फूल प्रूफ प्लॅन करायचा, किती कष्टाच, अन वेळखाऊ काम आहे माहित आहे का? अन भरीस भर म्हणून पुन्हा त्याची अंमल बजावणी, ती पण आपणच स्वतः करायची... परत एखाद दिवशी समजा नाहीच जमल, तर पुन्हा आपणच आपली खरडपट्टी काढायची!! आता आहे का?? म्हणजे आपणच आधी सगळ ठरवायच वगैरे, म्हणजे, संपूर्णतः आपण या संकल्पनेचे मालक असतो, नाही का?? पण सरते शेवटी ही संकल्पना, किंवा संकल्पच आपले मालक बनून जातात, अशी काहीशी परिस्थिती!! हे काय बरोबर वाटतय का, सांगा बर! सांगितलेत कोणी नको ते धंदे?? म्हणजे जर आपण ठरवणार असू, की आपल्याला अमूक अमूक, अस, याप्रकारे करायचय बरका आता नव्या वर्षापासून वगैरे, तर एखाद दिवशी ते नाही केल म्हणून काय बिघडणारे का??? पण तस नसत रे सायबा......

संकल्प केलाय, मग तो पार पाडायला हवा, असा काहीतरी अलिखित नियम आहे म्हणे!! म्हणजे, आपली स्वतःची काहीच हरकत नसते एखाद दिवस नेहमीच "संकल्प नामक रुटीन" बदलायला, पण ज्या कोणाला आपल्या संकल्पाची कल्पना असते त्या सर्वांची मात्र असते!! मग आधीच डोक्यावर ते संकल्प नामक ओझ आणि भरीला भर म्हणून सर्वांच्या हरकतीच ओझ!! सरळ साध असणार आयुष्य उगाचच खड्ड्यात घालायच असेल तर खुशाल करा संकल्प!! होऊनच जाऊंदेत मग!!

तर, तुम्हां सार्‍या उत्साही जनांना शुभेच्छा, संकल्प करण्यासाठी, ते अमलांत आणण्यासाठी आणि यदाकदाचित ते मोडलेच, तर फारस वाईट न वाटून घेण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्यांच्या कमेंटस धीरोदात्तपणे एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देण्यासाठीही. प्रयत्नांती संकल्पेश्वर म्हणे!!

तेह्वा, चालू देत तुमच संकल्पवाल्यांच. मी तरी आपलं, मस्तपैकी संकल्पविरहीत सुशेगात जगायच म्हणते यावर्षी!!

पण, आत्ता एक सुचल!! माझ्या ब्लॉग वाचक मायबापांसाठी एक आयडिया सुचली!! तुम्हां सार्‍यांना एक मस्त संकल्प सुचवू का?? :D

जेह्वा, जेह्वा, इथे या अनुदिनी वर याल, काही वाचाल, तर त्याबद्दल आपल मत जरुर सांगायच. संकल्प कसा वाटतो?? :) :D अगदीच काही नाही , तर निदान हाय हॅलो तरी म्हणा की!! :) म्हणजे कस, भेटल्यासारख वाटत ना, म्हणून! :) परत एकदा, येणार्‍या नववर्षाच्या शुभेच्छा!! :)

4 comments:

देवदत्त said...

खरंय तुमचे म्हणणे... संकल्प पाळणे जास्तकरून होतच नाही. म्हणून मी ही तेच ठरवले, की काही ही संकल्प करायचा नाही.

Satish said...

"मस्तपैकी संकल्पविरहीत सुशेगात जगायच म्हणते यावर्षी"

म्हन्जे सकंल्प न करण्याचा सकंल्प केलायस तर...:)

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .

- सतिश

Sonal Deshpande said...

नवीन संकल्पाची आयडिया छान आहे! आता कुठल्याही ब्लॉगला भेट दिली की मत शक्यतो नक्की देईन!!

Yashodhara said...

देवदत्त, सतिश, सोनल धन्यवाद. बरेच दिवस इथे आलेच नाही तेह्वा आता जरा उशीराच का होईना, पण तुम्हां सर्वांनाही नवीन वर्षाcया हार्दिक शुभेच्छा :)