December 2, 2007

एक पत्र

प्रिय,

तुला पत्र लिहायला बसलेय खरी, पण शब्दांपलीकडल्या भावनांना शब्दांत चपखलपणे उतरवायच कसब नाही जमत मला तितकस अजून. मग वाटत, लिहू का नको, कारण जे म्हणायचय ते नेमक उतरल नाही तर काय अर्थ राहिला... पण तशी चिंता नाहीच मला, कारण सगळं समजेलच तुला, न बोलता आणि नेमक न सांगता आल मला, तरीही. तशीही कधी पत्र ही लिहायची गरज भासलीच नाही आपल्याला. तुला वाचता येत माझ मन, तुझ्यासमोर असले काय न नसले काय, अंतर कितीही असल तरी काहीच फरक नाही पडत तसा. आत्ता याक्षणी देखील एकमेकांपासून खूप लांब असलो तरी, एकमेकांच्या मनांत काय चालत असेल हे लक्षात येतच आपल्या. उगाच शब्दांच गालबोट तरी कशाला??

तसही, आपल्यात शब्दांचा आधार शोधणारी मीच. तुला त्यांची कधी फ़ारशी असोशी नसतेच. प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडायलाच हवी का, हे तुझा नेहमीचाच प्रश्न. कमीत कमी शब्द वापरण लॉजिकल आहे, अस वरून आग्रही मत, आणि ते मांडायचा अन माझ्याकडून मान्य करवून घ्यायचा अट्टाहासही, जोडीला एक मिश्किल हसू. माझी सपशेल शरणागती तिथेच ठरलेली. पण हे लॉजिक, मी शब्द नाही वापरले तर कुठे पळून जात, हे आजत गायत मला समजलेल नाही, बघ!! तुला समजलय का रे??

भेटलो ना , तेह्वाच लक्षात आल होत माझ्या, की लांब राहिलेलच बर, कारण एकदा गुंतलो की परत त्यातून पाय सोडवण जमणार नाही, निदान या जन्मी तरी नाहीच, मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी फारसा फरक नाही पडणार! कितीही व्यस्त असलो अन कितीही जणांच्या घोळक्यात असलो तरी, हळूच एकदा नजर सर्वांच्या नकळत भिरभिरेल, तुझ अस्तित्व शोधायला. कान आसुसतील, ओळखीचा आवाज ऐकायला आणि मन तर कधीचच सुटलेल असेल हातातून, वावरत असेल तुझ्याच अवती भवती. आणि एवढ होऊन देखील सार्‍या गर्दीत मी नसतेच एकटी. माझ्या सोबतीला तुझ्या मनाचा एक कप्पा आहेच. कधी नव्हे ते बोलून दाखवलस, आणि एकदा मला समजावलस, एखाद्या रुसलेल्या लहान मुलीला समजवाव तस्सच अगदी..........

आठवत का रे तुला? किती आणि काय काय... जणू काही सार्‍या आयुष्याचा धांदोळा घेतलास, आणि सारी बेरीज वजाबाकी झाल्यावर लक्षात आल दोघांच्याही, की हे काही खर नाही गड्या, एकमेकांसोबत चालताना, दोघांचीही फरफटच होणार आहे सतत, एक तर एकमेकांची फरफट करायची नाही तर सभोवतालच्यांची. दोघांनाही मान्य नसलेला पर्याय! तू हताश, माझ्या डोळ्यांतून अगतिकता वहायला लागलेली...... सार काही बोलण्यापलीकडे पोचलेल.

मग म्हणालास, ठीक आहे, परत कधी सांगता येईल, न येईल म्हणून सांगतोच आता, "माझ्या आयुष्यात तुला, फक्त तुलाच, ध्रुवाच स्थान आहे. आयुष्यं समांतर वाहतील आता, आणि वहायलाही हवीत, स्वत:साठी नाही तरी इतरांसाठी, तसाही फक्त आपलाच हक्क कुठे असतो आपल्यावर? पण मी आहेच. कधीही हाक मारलीस तरी इथेच आहे. तुलाही ठाऊक आहे ना, मी ही तुझ्यासाठी सतत इथेच आहे?? "

प्रिय, त्या दिवशी मलाही हेच सांगायच होत, पण शब्दच वाहून गेले... नाही तरी प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगायला हवी असा थोडाच नियम आहे? जाणून आहेसच की तू देखील, की मीही सतत तुझीच आहे.....

10 comments:

Anonymous said...

त्या दिवशी मलाही हेच सांगायच होत, पण शब्दच वाहून गेले... नाही तरी प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगायला हवी असा थोडाच नियम आहे? जाणून आहेस की तू ही, की मी सतत तुझीच आहे.....>>..
shabd faar su.ndar vaaparale aahet
mast lihilay..

Anonymous said...

"त्यादिवशी .... शब्दच वाहून गेले " ........ विफ़ल, हताश , विरही मनाची विषण्णता उलघडणारी किती सुंदर कल्पना ! " पत्र " दोन जीवांच्या अतूट नात्याचे लक्षणीय दर्शन घडवते .
छान लिहिलेस !

आशा जोगळेकर said...

सुंदर . शब्दांत गुंफिले शब्दांच्या पलीकडचे.

सर्किट said...

सुरेख!
कुठलेही सूचक पर्सनल रेफ़रन्सेस देण्याचं टाळून तरल भावनांनी लिहीलंय, आणि तेही बिल्कुल कांगावा न करता, तृप्तपणे!

Sandip SS said...

Simply Gr8,
asahi maaybolivar tu lihilela vaachtoch, pan he mhanje agdi apratim.
shabdat na mandanyajoga (arthaat tuzach mat aahe te):)

Meghana Bhuskute said...

too good....

Abhijit Dharmadhikari said...

kevaL apratim!! kaay sunder bhashashailee aahe!

Kamini Phadnis Kembhavi said...

sundar....
shabdaateet

Swakaant... said...

e, mastach lihites ga... apratim!!

Anonymous said...

Khupch chan , sundar lihites ga tu ...

Arati