December 5, 2007

अन्न हे पूर्णब्रह्म!!...(१)

बेंगलोरला नोकरी मिळून एक वर्ष झालय आणि आता हळूहळू इथल्या रस्सम, सारमची सवय पण व्हायला लागलीय! न होऊन सांगतेय कोणाला?? एक वेळ सकाळच जेवण बनवण जमतं, पण रात्री घरी येऊन परत स्वयंपाकघराकडे जायला पण नको वाटत!

तरी, तस कंपनीत अगदीच सतत काही बेकार नसत जेवण. बरही असत कधी कधी. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे केवळ दाक्षिणात्य लोकच इथे काम करत नाहीत याची ही जाण कंपनीच्या प्रशासनाला आहे. त्यामुळे, उत्तर भारतीय प्रकारच खाण पण असतच. अगदी सामिष पण. त्यावर तर रोजच किती जणांच्या भक्तीभावे उड्या असतात!! कधी न पाहिल्यासारख!! नाही, नाही, मला सामिषाहाराचे मुळीच वावडे नाही. मी खात असे. आता सोडलय, तेही स्वेच्छेनेच. पण बनवते अजूनही. पण मुद्दा हा नाही, हे आपल असच, ओघानेच आल म्हणून.

मुद्दा वेगळाच. मी नेहमीच बघते, कितीतरी जणं जेवण घेताना आपापली ताटं अगदी भरून घेतात. इतक, की आता अजून घेतल तर खाली पडेल अन ताटातून पण ओसंडेल इतक. बर, घेतलत तर घ्या, असेल तुमची भूक तेवढी, तर जरूर घ्या, पोटभर जेवा, अगदी सुखाने तृप्त व्हा! पण हे एवढं, बकासुरी पद्ध्तीन घ्यायच अन मग ते पानात तसच टाकून द्यायच!! कोणती रीत आहे ही?? इतका संताप अन चिडचिडाट होतो माझा!! रोज ही अशी अन्नाची नासाडी करायला काहीच कस वाटत नाही या लोकांना?? इतका कसला माज?? का आपलं समोर भरपूर आहे, आणि सहजगत्या उपलब्ध होतय, म्हणून त्याची किंम्मत नाही?? जेवण झाल्यावर हात धुवायला गेल, की तिथले वाया घालवलेल्या अन्नाचे एक-दोन ड्रम - हो, हो ड्रम - पाहूनच मलाच पोटात खड्डा पडल्यासारख होत... किती उपाशी पोटं या अन्नावर भरली गेली असती, किंवा जाऊ शकतात हा विचार माझ मन कुरतडल्याशिवाय रहात नाही रोज.... विलक्षण अपराधी भावना माझ्या मनात दाटून येते अन अगदी खिन्न व्हायला होत!

आत्तापर्यंत, मी माझ्याबरोबर जेवायला जे कलीग्ज येतात, त्यांना सांगायचा, समजवायचा खूप प्रयत्न केलाय, नेहमीच करते, की सुरुवातीला पानात जरा कमीच घ्या अन्न, मग हव तर परत घ्या, अन त्याला काही बंदी पण नाहीये, तरीही बर्‍याचदा पालथ्या घड्यावर पाणी असत हे माझ्या लक्षात येत.

काही कळतच नाही मला... आजकाल माणसांची मन इतकी मख्ख झाली आहेत का?? खूप कुठे लांब जायला नको, इथेच बेंगलोरमधे रस्त्यांवरची भीक मागणारी, उपाशी तापाशी असणारी लहान मुलं, अठरा विश्व दारिद्र्य भोगणारी माणसं, झालच तर देशातले दुष्काळी प्रदेश, तिथली माणस, त्यांच्या वाट्याला आलेले भोग, खाणच काय, पाण्याच्या थेंबालाही महाग असणारी आयुष्य पण काही जण जगतात, हे यांना जाणवतच नाही का?? वाया जाणार्‍या अन्नाकडे बघून असे कोणतेच चेहरे आठवत नाहीत का? का सुशिक्षित म्हणायच यांना??

अर्थात, ज्या शहरात आपण राहतो तिथले प्रश्न जाणवत नसतील तर, देशासमोरच्या प्रश्नांवर विचार करण, ही खूप लांबची पायरी आहे म्हणा. ते तर जाऊच देत, पण एक मूलभूत सुसंस्कृतपणाही नाही का? इतक अन्न शांतपणे, जराही रुखरुख न बाळगता, टाकवतच कस मुळात? आपापल्या घरी ही असेच वागत असतील का हे?? समृद्धी माणसाला इतकी बेलगाम रीत्या बेजबाबदार बनवते?

वाया जाणार्‍या त्या अन्नाकडे बघून, अन्न हे पूर्णब्रह्म, हे उगाच कुठे तरी डोक्यात घणघणत राहत इतक मात्र खर!

5 comments:

Abhijit Dharmadhikari said...

chhan wichaar maanDalaay. DoLe ughaDaNaaraa!

सर्किट said...

एखादी गोष्ट इतका जिवाला त्रास देत असेल तर त्यावर आपल्यापरीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा, आणि सोडून द्यायचं.

इफ़ आय वॉज यू, त्या कॅण्टिनच्या प्रशासनाशी बोलून त्या २ ड्रम्सच्या समोर भुकेल्या गरीब मुलांच्या फ़ोटोंची कलर प्रिंट-आउट काढून चिकटवून दे.. खाली एकादा परिणामकारक पण छोटासा मेसेज लिही..

’फ़्री लंच’ ऐवजी ’पेड लंच’ करून बिल अन्नाच्या क्वाण्टिटीनुसार फ़ाडायची व्यवस्था करता येईलला असं सुचवता येईल..
(आघाऊपणाबद्दल क्षमस्व!)

यशोधरा said...

धन्यवाद अभिजित (धर्माधिकारी) :)

क्षमा कशाची? आगाऊपणा वगैरे काही वाटला नाही अभिजित (कुल्कर्णी), तुम्हांला, मला काय म्हणायचय, हे जाणवलय हेच बर वाटल. मी बोललेय प्रशासनाशी आणि ते पण तितकेच वैतागलेत सगळ्यांना समजावून! किती फ़्रस्ट्रेटींग़ आहे हे!! इमेल्स, पोस्टर्स, आणि काही.. सगळे उपाय करून थकलेत ते.

आणि अजून एक म्हणजे लंच, मधल्यावेळच खाण सगळ पेडच आहे :( फुकट काहीच नाही, तरीही ही परिस्थिती आहे!! त्यामुळेच तर आता मी पर्सनली बोलण्यावर भर ठेवते.... पण हे त्रासदायक आहे हे तितकच खर.

A woman from India said...

अन्नाची खरी किंमत मोजावी लागत नाही हे खरं कारण आहे. पिकवणार्‍यांवर आत्महत्येची पाळी येते आणि खाणारे टाकुन माज दाखवताहेत.

यशोधरा said...

दुर्दैवाने, तुम्ही म्हणताय ते खर आहे कसकाय :(